
सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील कास पठार पुन्हा एकदा फुलांनी बहरले असून या अलौकिक निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. जागतिक वारसास्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पठाराचा हंगाम यंदा चार सप्टेंबरपासून अधिकृतरीत्या सुरू झाला आहे.
सलग सुट्ट्यांमुळे गेल्या आठवड्यात हजारो पर्यटकांनी कासला भेट देत फुलांचा गालीचा अनुभवला. ईद-ए-मिलाद, अनंत चतुर्दशी व रविवारी सुट्टी यामुळे पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. बहुतांश पर्यटकांनी अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन बुकिंग केले होते; मात्र बुकिंगशिवाय आलेल्यांची संख्याही कमी नव्हती. गर्दीचा ताण लक्षात घेता कास कार्यकारी समितीकडून १३२ स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.
पठारावर टूथब्रश, दीपकांडी, सोनकी, आभाळी, भुईकारवी, तेरडा, चवर, पंद आदी रानफुलांनी बहर धरला आहे. लाल-गुलाबी तेरडा, गेंद, कुमुदिनी आणि ‘सीतेची आसवे’ फुलांनीही पर्यटकांना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. दाट धुके, रिमझिम पाऊस आणि आल्हाददायक वाऱ्यामुळे येथील वातावरण अधिकच रमणीय झाले आहे.
पावसाची उसंत मिळाल्याने गेल्या काही दिवसांत फुलांचा बहर अधिक खुलला आहे. पठारावर अधूनमधून ऊन-सावल्यांचा खेळ दिसत असल्याने पर्यटकांना निसर्गाच्या विविध छटा अनुभवायला मिळत आहेत.
यंदा उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी पदभार घेतल्यानंतर काही नवे उपक्रम राबवले आहेत. त्यात विशेष म्हणजे ग्रामीण जीवनाचा अनुभव देण्यासाठी पर्यटकांसाठी बैलगाडी सफरीची सोय करण्यात आली आहे. या सफरीतून कुमुदिनी तलावापर्यंत जाता येत असून पर्यटक याचा आनंद घेत आहेत.
सांगली येथील वैभव बंडगर यांनी पठाराच्या भेटीनंतर आपली प्रतिक्रिया देताना सांगितले, “फुलांचे प्रमाण समाधानकारक आहे. धुके व ऊन-सावल्यांचा खेळ यामुळे वातावरण अतिशय रमणीय आहे. खरंच, कास हे ‘खास’ आहे.”