
सातारा प्रतिनिधी
सातारा – कोरेगाव तालुक्यातील बोरगाव येथील तलाठी रणजित अर्जुन घाटेराव (वय ३२, रा. अहिरे कॉलनी, सातारा) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
टकले (ता. कोरेगाव) येथील गट क्रमांक १०० मधील ९० गुंठे शेती वारसा नोंदणीसाठी घाटेराव यांनी दोन हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराकडून आधीच एक हजार रुपये घेतल्यानंतर उर्वरित रक्कमेची मागणी कायम राहिली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे धाव घेतली.
पडताळणीनंतर सोमवारी (दि. ९ सप्टेंबर) सापळा रचण्यात आला. या कारवाईत तलाठी घाटेराव यांनी पंचासमक्ष एक हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याच क्षणी त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. नितीन गोगावले, पो. हवा. निलेश राजपुरे, पो. कॉ. सत्यम थोरात व अजयराज देशमुख यांनी केली. परीवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक राजेश वसंत वाघमारे होते, तर मार्गदर्शन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (पुणे परिक्षेत्र) व अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांचे लाभले.