
सातारा प्रतिनिधी
मलकापूर (ता. कराड) परिसरात वन्यजीवांची बेकायदेशीर शिकार करणाऱ्यांवर वनविभागाने कारवाई केली आहे. मोर आणि लांडोर या संरक्षित पक्षी व प्राण्यांची शिकार झाल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. तर त्याचे दोन साथीदार फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
तुळसण-ओंड रस्त्यालगत रविवारी रात्री वनरक्षक गस्त घालत असताना छर्राबंदुकीचा आवाज ऐकू आला. घटनास्थळी पाहणी केली असता मृत मोर आणि लांडोर तसेच शिकार करण्यासाठी वापरलेली बंदूक आणि दुचाकी मिळून आली. आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाले होते.
वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा नोंदवून वनविभागाच्या श्वानपथकाच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला. श्वान पथक आरोपी सुधीर सर्जेराव पाटील (रा. उंडाळे, ता. कराड) याच्या घरापर्यंत पोहोचले. चौकशीत त्याने दोन साथीदारांची नावे सांगितली असून, अमित चौगुले व रवि पावणे (रा. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली) हे आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती वनविभागाने दिली.
ही कारवाई सातारा उपवनसंरक्षक अमोल सातपुते व सहायक वनसंरक्षक जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कराड वनक्षेत्रपाल ललिता पाटील, कोळे वनपाल दिलीप कांबळे, म्हासोली वनरक्षक संतोष पाटील, कासारशिरंबे वनरक्षक दशरथ चिट्टे, अभिनंदन सावंत आदींनी केली.