मुंबई : प्रतिनिधी
बीडीडी चाळ पुनर्विकास योजनेअंतर्गत वरळीतील रहिवाशांना नुकतीच नवीन घरे मिळाली. १६० चौरस फुटांतून थेट ५०० चौरस फूट, दोन बेडरुमच्या उंच टॉवरमधील घरांमध्ये स्थलांतर झाल्यानंतर आनंदाचे वातावरण होते. मात्र, आता या घरांपैकी काहींनी विक्रीची तयारी केल्याची माहिती समोर येत असून, त्यावरून संतापाची लाट उसळली आहे.
१४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चावी वाटप सोहळा झाला. त्यावेळी त्यांनी “ही सोन्यासारखी घरं विकू नका, पुढील पिढीसाठी वारसा म्हणून जपून ठेवा” असे आवाहन केले होते. पण हे आवाहन धाब्यावर बसवल्याचे चित्र काही दिवसांतच दिसू लागले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनुसार, वरळी बीडीडीतील एका नव्या टॉवरच्या सर्वोच्च मजल्यावरील फ्लॅट विक्रीसाठी काढण्यात आला आहे. ५०० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या फ्लॅटची मागणी तब्बल २ कोटी ८० लाख रुपये इतकी करण्यात आली असून, किंमतीत थोडाफार बदल होऊ शकतो असे सांगण्यात आले आहे. या फ्लॅटसोबत लिफ्ट व एक कार पार्किंगची सुविधाही असल्याचे जाहिरातीत नमूद आहे.
या घडामोडीनंतर सोशल मीडियावर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. “आमचा मराठी माणूस ही रूम विकून मुंबईबाहेर जाणार”, “असं नका करू रे, मुंबईला यांच्या ताब्यात नका देऊ” अशा संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
सरकारकडून मिळालेली ‘मोफत सोन्याहूनही मौल्यवान घरे’ काही रहिवाशांनी विक्रीस काढल्याने बीडीडी पुनर्विकासाच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


