
मुंबई प्रतिनिधी
मुंबईत २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त उभारला आहे. तब्बल १५ हजार पोलिस दलासह ११ हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या साहाय्याने शहरावर करडी नजर ठेवली जाणार आहे.
लालबागचा राजा, गिरगाव चौपाटी यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी विशेष पोलीस तैनात करण्यात आले असून, फक्त लालबाग परिसरातच ५०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. “अनुचित प्रकार टाळण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे,” अशी माहिती सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली.
बंदोबस्ताची रूपरेषा
१५ हजार पोलिस, २,६०० अधिकारी
७ अतिरिक्त पोलिस आयुक्त, ३६ उपायुक्त, ५१ सहाय्यक आयुक्त
१२ एसआरपी कंपन्या, क्यूआरटी, श्वानपथक व बीडीडीएस सज्ज
४५० मोबाइल व्हॅन, ३५० बीट मार्शल सतत गस्तीसाठी
गणेशोत्सवात समुद्रकिनारे आणि चौपाट्यांवर मोठी गर्दी होते. यासाठी स्वतंत्र सीसीटीव्ही, ड्रोननिगराणी आणि गस्त घालणाऱ्या पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
‘नमो एक्सप्रेस’ने गणेशभक्त कोकणाकडे
मुंबईसह कोकणातही गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ‘नमो एक्सप्रेस’ या विशेष गाडीला कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हिरवा झेंडा दाखवला.
या गाडीतून सुमारे दोन हजार गणेशभक्त कोकणात रवाना झाले. प्रवाशांसाठी मोफत नाश्ता व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. “गणेशोत्सव हा राज्य महोत्सव असल्याने भक्तांच्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी ही सेवा सुरू आहे,” असे लोढा यांनी सांगितले.