
सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यात गुन्हेगारी नियंत्रणासोबतच सामाजिक उपक्रमांतही विशेष कामगिरी बजावणाऱ्या म्हसवड पोलिस ठाण्याला ‘जुलै २०२५’ महिन्यातील सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते झालेल्या जिल्हास्तरीय क्राईम कॉन्फरन्समध्ये हा गौरव करण्यात आला.
गुन्हे शाखेच्या उपक्रमांतर्गत प्रत्येक महिन्याला जिल्ह्यातील ठाण्यांचे कामकाज तपासून सरस कामगिरी करणाऱ्यांना गौरविले जाते. यामध्ये म्हसवड पोलिस ठाण्याने जुलै महिन्यात सर्वाधिक मुद्देमाल निर्गती करून तक्रारदार, फिर्यादी व साक्षीदार यांना त्यांचा हक्काचा माल परत दिला. त्याबरोबरच शाळा-महाविद्यालयांमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी राबविलेल्या मोहिमा, गुड टच-बॅड टच याबाबतचे मार्गदर्शन, ‘रोड रोमिओ’विरोधातील कारवाई आदींमध्येही म्हसवड ठाण्याने आघाडी घेतली.
या कामगिरीच्या जोरावर ठाण्याला सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प पुरस्कार मिळाला. तसेच महिलांविरोधातील गंभीर गुन्ह्याचा तपास अवघ्या २४ तासांत पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याबद्दलही विशेष गौरव करण्यात आला.
या प्रसंगी सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह कर्मचारी शशिकांत खाडे, रूपाली फडतरे, सतीश जाधव, राहुल थोरात आणि हर्षदा गडदे यांचा सन्मान करण्यात आला.