मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या धोरणांविरोधी कार्य केल्याच्या कारणास्तव राज्य सरचिटणीस व कोकण संघटक वैभव खेडेकर यांना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून खेडेकर भाजप किंवा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर त्या चर्चांना शिक्कामोर्तब करत मनसेने ही कारवाई केली आहे.
सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार खालील पदाधिकाऱ्यांची पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे हकालपट्टी करण्यात आली आहे. तरी सर्व महाराष्ट्र सैनिकांनी याची नोंद घ्यावी.#MNSAdhikrut pic.twitter.com/paBgD7Ejcq
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 25, 2025
यासोबतच अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि सुबोध जाधव यांनाही पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.
खेडेकर यांचा मनसे प्रवास
२००६ मध्ये मनसेची स्थापना झाल्यापासून खेडेकर हे राज ठाकरे यांच्यासोबत सक्रिय आहेत. कोकणातील संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले. दापोली आणि खेड परिसरात त्यांचा चांगला प्रभाव असून तरुणांमध्येही ते लोकप्रिय होते.
खेड नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले असून, खेड नगरपरिषदेत मनसेला सत्ता मिळवून देण्यात त्यांनी निर्णायक भूमिका बजावली. २०१८ मध्ये तत्कालीन पर्यावरणमंत्री रामदास कदम व आमदार योगेश कदम यांच्याशी त्यांचा संघर्ष झाला होता. मात्र, अलीकडील एका सार्वजनिक कार्यक्रमात रामदास कदम यांनी सर्व मतभेद विसरून सहकार्याची भाषा केली होती.
भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण
अलीकडेच दापोलीत झालेल्या महायुतीच्या सभेत खेडेकर उपस्थित होते. त्यावेळी भाजपकडून त्यांना उघडपणे पक्षप्रवेशाचे निमंत्रण देण्यात आले. खेडेकर यांनी प्रवेशाचे वृत्त नाकारले असले तरी त्यांच्या निकटवर्तीयांनी प्रवेश जवळपास निश्चित असल्याचे संकेत दिले होते.
पक्षशिस्तभंगामुळे कारवाई
“आपण पक्षाच्या धोरणांचे उल्लंघन केले व पक्षविरोधी कार्य केले,” असे नमूद करत खेडेकर व अन्य तिघांना मनसेकडून हकालपट्टीचे पत्र पाठवण्यात आले आहे. हा निर्णय राज ठाकरे यांच्या आदेशानुसार घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोकणात मनसेला मोठा धक्का
वैभव खेडेकर हे कोकणातील मनसेचे आक्रमक व प्रभावी नेतृत्व मानले जात होते. त्यामुळे त्यांच्या हकालपट्टीमुळे संघटनात्मक पातळीवर मनसेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


