
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई | माटुंगा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने महिंद्रा थार मो/कार चोरी करणाऱ्या एका चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून तब्बल १२ लाख रुपये किंमतीची चोरीस गेलेली गाडी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ जुलै ते २५ जुलैदरम्यान माटुंगा परिसरातील एका रहिवाशाची काळ्या रंगाची महिंद्रा थार (क्र. UP78-GV-2977) अज्ञात व्यक्तीने घरासमोरून चोरून नेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक तपासासोबत गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला. मानखुर्द परिसरातून दत्तात्रय सर्जेराव पवार (वय २४, रा. खटाव, जिल्हा सातारा) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेली महिंद्रा थार जप्त करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त देवन भारती, सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, सहाय्यक पोलीस आयुक्त रागसुधा आर., तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील, तसेच पोलीस शिपाई जुवाटकर, देशमाने, बहादुरे, तोडासे, मेटकर आणि सोनवलकर यांनी विशेष भूमिका बजावली. पुढील तपास पो.उ.नि. सुनील पाटील करीत आहेत.