बुलढाणा प्रतिनिधी
नांदुरा शहरात बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ४१ धारदार तलवारी जप्त केल्या. खामगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
खात्रीलायक माहितीनुसार, नांदुर्यातील शेख वसीम शेख सलीम (वय ३३, रा. शाहीन कॉलनी) हा अवैधरित्या तलवारींची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार संयुक्त पथकाने बुधवारी रात्री शेख वसीमच्या घरावर धाड टाकली. यावेळी तो आपल्या पल्सर मोटारसायकलवर (एमएच २८ बीएन २२७७) एक पांढऱ्या पोतडीसह बाहेर पडताना पोलिसांना दिसला. तपासणीअंती त्या पोतडीत एकूण ४१ तलवारी सापडल्या.
या सर्व तलवारींवर ‘सिरोही की सुप्रसिद्ध तलवार – १०० साल वारंटी’ अशी नोंद कोरलेली होती. प्रत्येकी तलवार ८२ सेंमी लांबीची असून त्यातील पात्याची लांबी ७० सेंमी आहे. या ४१ तलवारींची अंदाजे किंमत ८२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीकडून ८० हजारांची मोटारसायकल आणि २० हजारांचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण १.८२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत झाला.
ही कारवाई बुलढाणा जिल्हा पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यात अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, एपीआय सचिन पाटील, पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार सहभागी होते.
या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी आरोपी शेख वसीमविरुद्ध भारतीय शस्त्र कायद्याच्या कलम ४, ७, २५ तसेच मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ नुसार गुन्हा नोंदविला आहे.


