
सातारा प्रतिनिधी
सातारा : जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून एकही बाधित कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
कराड तालुक्यातील तांबवे पूल व प्रितीसंगम परिसराची पाहणी करून देसाई यांनी कराड येथे तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. “धरणातून विसर्ग कमी झाला आणि पावसाचा जोर ओसरला असला तरी ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील व वीज विभागाचे कर्मचारी २४ तास सज्ज राहावेत. रस्ते, साकवे, पुल, वीज वाहिन्या व इतर सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून शासनाकडे अहवाल सादर करावेत,” असे निर्देश त्यांनी दिले.
पूरग्रस्त भागात शाळा बंद ठेवावी लागल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढावे, अशी सूचना देसाई यांनी केली. दरड कोसळून वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी जेसीबी धारकांची माहिती सरपंचांकडे उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कराड शहरातील पाण्याखाली जाणाऱ्या घरांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची प्रक्रिया नगरपालिकेने हाती घ्यावी, असे निर्देश देसाई यांनी दिले. कृष्णा व कोयना नदीमधून येणारे गढूळ पाणी शुद्ध करूनच नागरिकांना पिण्यास द्यावे आणि पूरस्थितीनंतर साथीचे रोग पसरू नयेत याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
सातारा तालुक्यातील संगम माहुली येथील पूरस्थितीची पाहणी करून तेथील उपाययोजनांची माहितीही देसाई यांनी घेतली.