
मुंबई प्रतिनिधी
सध्या राज्यभरात ‘हिंदी सक्ती’ आणि ‘मराठी अस्मिता’ यावरून चांगलाच राजकीय व सामाजिक वाद पेटला असताना, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांनी मराठी भाषेबाबत दिलेले भावनिक वक्तव्य आता चर्चेचा विषय ठरत आहे. “मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेला आहे, आणि याच मातृभाषेतून घेतलेल्या शिक्षणामुळेच माझ्या आयुष्याला योग्य दिशा मिळाली,” असे सांगत गवई यांनी मराठी शाळांचे महत्त्व अधोरेखित केले.
राज्य सरकारने इयत्ता १ ते ५ च्या विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत ‘हिंदी अनिवार्य’ करण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत ‘मराठी अस्मितेसाठी’ एकत्रित लढा सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर गवई यांच्या विधानाने वादात एक नवा सूर दिला आहे.
गिरगावच्या मराठी शाळेला दिली भेट
मुंबई दौर्यावर असताना सरन्यायाधीश गवई यांनी आपल्या बालपणीच्या गिरगाव येथील शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थी जीवनाच्या आठवणी जागवताना म्हटले, “मी आज जिथे आहे, ते केवळ माझ्या शिक्षकांच्या संस्कारांमुळे. मराठी माध्यमामुळे मला शिक्षणात विषयांची समज अधिक गडद झाली. वक्तृत्व स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे आत्मविश्वास मिळाला, याच संधींमुळे माझी घडण झाली.”
“मातृभाषेतून शिकल्यामुळे वैचारिक पाया घट्ट झाला”
मराठी माध्यमात शिक्षण घेतल्यामुळे विचारांची पायाभरणी अधिक ठाम झाल्याचे गवई यांनी स्पष्ट केले. “शिक्षण हे केवळ ज्ञानपुरते मर्यादित नसते, तर ते संस्कारही देते. मातृभाषेतून शिकल्यामुळेच हे दोन्ही समान पातळीवर मिळाले,” असे ते म्हणाले.
गवई यांच्या या विधानाला ‘मराठी माध्यमाची ताकद’ अधोरेखित करणारे वक्तव्य म्हणून पाहिले जात असून, राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठी बनाम हिंदीच्या वादात यामुळे एक महत्त्वपूर्ण दृष्टीकोन समोर आला आहे.
‘मराठीचा आवाज बुलंद करा’
राज-उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच मुंबईत घेतलेल्या सभेत मराठी भाषेच्या सक्तीच्या बाजूने आवाज उठवला होता. आता सरन्यायाधीशांनी दिलेल्या या विधानामुळे त्या चळवळीला एका प्रकारचे नैतिक बळ मिळाल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेच्या प्रमुख पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीने मातृभाषेच्या भूमिकेची महती सांगणे म्हणजे मराठी भाषेसाठी अभिमानास्पद क्षणच. राजकारण, समाजकारण आणि शिक्षणाच्या केंद्रस्थानी असलेल्या या भाषेच्या भवितव्यासाठी हे वक्तव्य प्रेरणादायी ठरत आहे.