
अमरावती प्रतिनिधी
अमरावती शहरात सोमवारी सकाळी एक चकित करणारी घटना घडली. वलगाव पोलिस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कादर यांची भर रस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी आधी त्यांच्या दुचाकीला फोर व्हिलरने धडक दिली आणि त्यानंतर धारदार शस्त्राने सपासप वार करत ठार केलं.
पोलिस खात्यात खळबळ उडवणाऱ्या या घटनेनंतर संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. नागरिकांमध्ये अस्वस्थता असून, “जर पोलिसच सुरक्षित नाहीत, तर आम्ही कुणाकडे पाहायचं?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सकाळच्या सुमारास कलाम हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना, एक फोर व्हिलर त्यांच्या बाईकवर आदळली. त्यानंतर चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या पोटावर आणि छातीवर धारदार शस्त्रांनी वार केले. गंभीर अवस्थेत त्यांना तत्काळ जवळील बेस्ट रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
घटनास्थळी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी भेट देत पाहणी केली असून, हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी दोन विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक पुरावे याच्या आधारे तपास सुरू आहे.
या घटनेमुळे पोलिस खात्याच्या अंतर्गत सुरक्षेच्या उपाययोजनांवर आणि शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हल्लेखोर लवकरात लवकर गजाआड जावेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून आणि पोलिस संघटनांकडून केली जात आहे.