
मुंबई प्रतिनिधी
मुंबई | २४ कॅरेट सोन्याचे बिस्किट देण्याचे आमिष दाखवून २२ कॅरेटच्या दागिन्यांची लुबाडणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश BKC पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, चौकशीत BKC पोलीस ठाण्यातील तीन आणि VP रोड पोलीस ठाण्यातील एका फसवणुकीच्या गुन्ह्याचा छडा लागला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राकेश लिलानी, मोड हनीफ अब्दुल्ला शामा आणि विक्रांत रंगराज पारेख अशी आहेत. हे तिघेही पूर्वी हिरे व्यापाऱ्यांसाठी दलाल म्हणून काम करत होते. मात्र, नंतर त्यांनी गुन्हेगारीकडे वळत सराफांना लक्ष्य करायला सुरुवात केली.
फसवणुकीचा प्रकार असा घडत असे…
टोळीतील सदस्य सराफांना २४ कॅरेट सोन्याच्या बारच्या बदल्यात २२ कॅरेट सोन्याचे दागिने मागवायचे. सराफ दागिने तयार करून दिल्यावर त्याच वेळी त्यांना सोन्याचा बार दिला जात असे. मात्र, तो बार बनावट असून हे सराफांच्या लक्षात येईपर्यंत आरोपी पसार होत असत.
पोलिसांच्या तपासात आतापर्यंत चार फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींना न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
BKC पोलिसांचा हा तपास वाखाणण्याजोगा असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.