मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, हा प्रश्न मागील काही दिवसांपासून सातत्याने विचारला जात होता. आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून, या योजनेतील सन्माननिधीचे वितरण आजपासून सुरू झाले आहे.
अनेक पात्र महिलांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा झाले असून, इतर महिलांनीही आपल्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, हे तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भातील माहिती एक्स (पूर्वीचा ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिली आहे. गेल्या वर्षी जुलै २०२४ मध्ये राज्य सरकारने ही योजना सुरू केली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा १५०० सन्माननिधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार, ऑगस्ट २०२४ पासून पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले.ऑक्टोबर २०२४ पर्यंत महिलांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली होती.
या कालावधीत कोट्यवधी महिलांनी अर्ज भरले आणि त्यापैकी अनेक महिलांना लाभ मिळण्यास सुरुवातही झाली. एप्रिल महिन्यापर्यंत १० हप्त्यांचे वितरण झाले असून, आता मे महिन्याचा ११ वा हप्ता वितरित होऊ लागला आहे. एप्रिलमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने हप्ता मिळाला होता. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता देखील वेळेत मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, मे महिना संपेपर्यंत हप्ता न मिळाल्याने महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
छाननी प्रक्रिया सुरू
दरम्यान, जानेवारी २०२५ पासून अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू झाली असून, त्यामध्ये लाखो शासकीय कर्मचारी महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. तसेच विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही योजनेतून वगळण्यात आले आहे. मात्र, या तपासणीतून पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात आता मे महिन्याचा हप्ता जमा केला जात आहे.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्माननिधी देण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे मार्गदर्शन तसेच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा विश्वास यामुळे ही योजना यशस्वीरित्या पुढे नेली जात आहे,” असे मत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.


