सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व बँक एम्प्लाईज युनियनमध्ये बँक सेवकांकरिता सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा करार शनिवारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत करण्यात आला आहे.
करारानुसार १४ टक्क्यांपर्यंत पगारवाढ झाली आहे. एक एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२९ अखेर पाच वर्षे मुदतीचा पगारवाढीचा करार करण्यात आला. सुधारित वेतनश्रेणी एक एप्रिल २०२४ पासून लागू होणार आहे. याचा बँकेवर साधारणपणे वार्षिक १४.५० कोटींचा बोजा पडणार आहे.
या करारावर बँकेच्या वतीने अध्यक्ष, खासदार नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, बँक एम्प्लाईज युनियन कोल्हापूर यांच्या वतीने अध्यक्ष अतुल दिघे, जनरल सेक्रेटरी नारायण मिरजकर, सेक्रेटरी प्रकाश जाधव, सेवक प्रतिनिधी संग्रामसिंह जाधव, जितेंद्र चौधरी यांनी सह्या केल्या.
हा करार बँकेचे ज्येष्ठ संचालक व विधान परिषदेचे माजी सभापती, आमदार रामराजे नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे, दत्तानाना ढमाळ, राजेंद्र राजपुरे, प्रदीप विधाते, सुनील खत्री, रामराव लेंभे, ज्ञानदेव रांजणे, सुरेश सावंत, लहुराज जाधव, संचालिका कांचन साळुंखे, ऋतुजा पाटील, बँकेचे सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे यांच्या उपस्थितीत साक्षांकित करण्यात आले.
बँकेचे संचालक व सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी सेवक पगारवाढ समिती सभेस उपस्थित राहून कर्मचाऱ्यांची पगारवाढ संदर्भात विशेष सहकार्य केले. नितीन पाटील म्हणाले, ”बॅंकेच्या सर्व सेवकांनी नवीन कार्यान्वित केलेल्या संगणकीय प्रणालीचा जास्तीतजास्त वापर करून बँकेचे सभासद व ग्राहक यांना जलद सेवा द्यावी.”
रामराजे नाईक निंबाळकर यांनी कर्मचाऱ्यांनी आपली कार्यक्षमता वाढवून बँकेचा व्यवसाय वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्नशील राहावे. डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, ”सेवकांच्या अनेक मागण्यांबाबत बँक एम्प्लाईज युनियन, कोल्हापूर युनिट सातारा हे वेळोवेळी संचालक मंडळाच्या संपर्कामध्ये होते. बँकेनेही सेवकांच्या अनेक अडीअडचणी यथायोग्य सोडविल्याने सेवकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.’ अतुल दिघे यांनी जिल्हा बँकेच्या सर्वोत्कृष्ट कामाची प्रशंसा केली.
पगारवाढीबरोबर मिळणारे लाभ…
जीडीसी ॲण्ड ए, जेएआयआयबी, सीएआयआयबी, पीएचडी, सीए आदी अभ्यासक्रमांत यश मिळविणाऱ्या प्रत्येक अभ्यासक्रमासाठी एक वेतनवाढ, अर्ध वर्षाअखेर आणि वर्षाअखेर कामकाजासाठी क्लोझिंग अलाउंस, तसेच श्रेणीप्रमाणे विशेष अलाउंस मिळणार. हृदयरोग, कॅन्सर, किडनी प्रत्यारोपण, गंभीर अपघातांसाठी ३० दिवसांची विशेष आजारी रजा, सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर बँकेत नोकरी मिळणार आहे.


