मुंबई प्रतिनिधी
मुंबई : टिळक भवन येथे झालेल्या धरपकडीनंतरही आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला असून, परवानगी घेऊन २५ ऑक्टोबरला मोठ्या संख्येने मुंबईत पुन्हा दाखल होऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे.
आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी परवानगी द्यावी किंवा राज्यपालांची भेट घेण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. मात्र, आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आली असून पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मुंबईबाहेर पाठवले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
विद्यार्थी प्रतिनिधी विनेश वडे यांनी सांगितले की, आंदोलनाची पुढील दिशा सरकारला आधीच कळवण्यात आली होती. परवानगी मिळाल्यानंतर पुन्हा मुंबईत आंदोलन केले जाईल, असे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, अद्याप त्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी कायम आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना पुन्हा ई-मेल करून आंदोलनाची माहिती देण्यात येणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. २५ ऑक्टोबरला मोठ्या संख्येने मुंबईत येण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलक किरण पावरा यांनी पोलिसांच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थी आठ दिवस पायी चालत मुंबईत आले असून, त्यांचे पाय सुजले आहेत. शिक्षण आणि हक्कांसाठी विद्यार्थी येथे आले असताना त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी पोलिसांनी त्यांना मुंबईबाहेर पाठवणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याचा समावेश आहे. याशिवाय आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी आणि दर्जेदार भोजन मिळणे, वसतिगृहांमधील सुविधांमध्ये सुधारणा करणे तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रलंबित शिष्यवृत्तीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, अशीही विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्याचबरोबर आश्रमशाळांमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूंची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे.


