स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : खार (प.) येथील पी.डी. हिंदुजा रोड परिसरात राहणारे ५३ वर्षीय चेतन बळराम चंदन यांच्या घरातून ७ लाख ५० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना २५ सप्टेंबर २०२६ रोजी घडली होती. त्यांच्या घरी काम करणारा संतोष विजयकुमार गौड याने कपाटात ठेवलेली रोकड चोरून नेल्याची तक्रार खार पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
या तक्रारीनंतर खार पोलीस ठाण्यात २९ सप्टेंबर २०२६ रोजी गु.र.क्र. १६३७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाला वेग देत आरोपी संतोष विजयकुमार गौड याचा शोध घेतला आणि १ ऑक्टोबर २०२६ रोजी त्याला अटक केली.
तपासादरम्यान आरोपीकडून चोरीस गेलेली संपूर्ण ७ लाख ५० हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर हस्तगत मालमत्ता तक्रारदाराला परत करण्यासाठी आवश्यक न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ६ ऑक्टोबर २०२६ रोजी मा. पोलीस उपायुक्त, पश्चिम परिमंडळ-२, मुंबई यांच्या हस्ते चोरीची संपूर्ण मालमत्ता तक्रारदार चेतन चंदन यांना परत करण्यात आली. चोरीला गेलेली संपूर्ण रक्कम परत मिळाल्याने तक्रारदाराने खार पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे आभार मानले.


