स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : सायबर फसवणुकीच्या रकमेतून महागडे मोबाईल फोन खरेदी करणाऱ्या टोळीचा लो. टि. मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना कुर्ला आणि अहमदाबाद, गुजरात येथून अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून एकूण १९ लाख ६६ हजार ७५ रुपयांचे २५ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.
लो. टि. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणात तक्रारदाराला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन करण्यात आला होता. संबंधित व्यक्तीने आपण आरबीएल क्रेडिट कार्डकडून बोलत असल्याचे भासवले. तक्रारदाराच्या आरबीएल क्रेडिट कार्डवर सुरू असलेली मेल ऑर्डर सेवा बंद करण्याच्या नावाखाली त्यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर एक लिंक पाठवून ती उघडण्यास सांगण्यात आले.
तक्रारदाराने लिंक उघडल्यानंतर त्यांच्या परवानगीशिवाय क्रेडिट कार्डमधून तीन व्यवहार करण्यात आले. या व्यवहारांच्या माध्यमातून स्विगी या माध्यमावरून एकूण ४ लाख ४८ हजार ७२१ रुपयांची खरेदी करण्यात आली. त्यानंतर याप्रकरणी लो. टि. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. त्यानंतर अनिसबेग समिरबेग मिर्झा (वय २३) आणि मोईन रहिम शेख (वय ३४) या दोघांना कुर्ला आणि अहमदाबाद येथून अटक करण्यात आली.
अटक आरोपींकडून या गुन्ह्यातील दोन ॲपल कंपनीचे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. तसेच इतर गुन्ह्यांशी संबंधित ॲपल, सॅमसंग, गुगल, विवो यांसह विविध कंपन्यांचे २३ मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले. अशा प्रकारे एकूण २५ मोबाईल फोन पोलिसांच्या हाती लागले असून, त्यांची एकूण किंमत १९ लाख ६६ हजार ७५ रुपये आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (द.प्रा.वि.) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (दक्षिण परिमंडळ ०२) रागसुधा आर. आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (पायधुनी विभाग) रेणूका बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दंडवते, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सायबर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय मेटकरी, पोलीस उपनिरीक्षक सतिश बडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोगावले, पोलीस शिपाई अविनाश पाटील, संतोष कचरे, निलेश झगडे, अमोल जगदाळे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील, पोलीस हवालदार सागर विचारे आणि पोलीस शिपाई जगदेव यांनी ही कारवाई पार पाडली.


