मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील गिरगाव परिसरातील एका व्यावसायिकाला इन्स्टाग्रामवर अनोळखी महिलेशी झालेली मैत्री चांगलीच महागात पडल्याची घटना समोर आली आहे. आधी इन्स्टाग्रामवरून मैत्री, त्यानंतर व्हिडिओ कॉल आणि पुढे अश्लील व्हिडिओच्या नावाखाली साडेतीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याने अखेर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदाराला इन्स्टाग्रामवरील एका महिलेच्या खात्यावरून ‘Hi’ असा संदेश आला होता. त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. सुमारे दोन महिन्यांनी या महिलेने तक्रारदाराला दुसऱ्या एका इन्स्टाग्राम खात्यावरील महिलेशी बोलण्याचा आग्रह केला. सुरुवातीला तक्रारदाराने नकार दिला. मात्र वारंवार आग्रह केल्यानंतर त्याने संबंधित खात्याशी संपर्क साधला.
यानंतर एका रात्री सुमारे ११ वाजता ‘kanxi_maya’ या वापरकर्तानावाच्या खात्यावरून तक्रारदाराला व्हिडिओ कॉल आला. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ कॉलवरील महिला नग्न अवस्थेत होती आणि तिने तक्रारदारालाही कपडे काढण्यास सांगितले. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तक्रारदाराने तिचे म्हणणे ऐकले. अवघ्या दोन मिनिटांच्या या व्हिडिओ कॉलचे समोरील व्यक्तीने स्क्रीन रेकॉर्डिंग केल्याचा आरोप आहे.
अश्लील व्हिडिओच्या नावाखाली साडेतीन लाखांची मागणी
यानंतर २ जून रोजी तक्रारदाराला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने तक्रारदाराचा अश्लील व्हिडिओ आपल्याकडे असल्याचे सांगितले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत साडेतीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली.
यानंतर मेसेजद्वारेही वारंवार पैशांची मागणी करण्यात आली आणि धमक्या दिल्या जाऊ लागल्या. सुरुवातीला भीतीपोटी तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार केली नाही. मात्र धमक्यांचे सत्र थांबत नसल्याने अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
इन्स्टाग्रामवरील मैत्रीचा गैरफायदा घेत व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सापळा रचून ब्लॅकमेलिंग करण्यात आल्याचा संशय आहे. या प्रकरणातील संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासह संपूर्ण प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.


