सांगली प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर शहरात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओळखीचा गैरफायदा घेत दोन तरुणांनी विद्यार्थिनीला कामेरी रस्त्यावरील एका लॉजवर नेले. तेथे शीतपेयातून गुंगीचे औषध दिल्यानंतर तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. यानंतर हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शार्दुल विद्यापती पाटील (२१, रा. रेठरेधरण) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर प्रथम सचिन पाटील (रा. ईश्वरपूर) हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
ओळखीचा गैरफायदा घेत लॉजवर नेले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मूळची सातारा जिल्ह्यातील असून ईश्वरपूर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तिची संशयित आरोपींसोबत ओळख होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत आरोपींनी तिला गोड बोलून कामेरी रस्त्यावरील एका लॉजवर नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
लॉजमध्ये गेल्यानंतर तरुणीच्या नकळत शीतपेयातून गुंगीचे औषध देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर तरुणीला गुंगी आल्यानंतर दोन्ही संशयितांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केल्याचे पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
धमकीनंतरही तरुणीने गाठले पोलिस ठाणे
घटनेनंतर आरोपींनी हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. मात्र या धमकीला न घाबरता पीडित तरुणीने ईश्वरपूर पोलिस ठाणे गाठून आपल्यासोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला. त्यापैकी शार्दुल पाटील याला तत्काळ अटक करण्यात आली असून दुसऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे.
कॉलेज परिसरात खळबळ
अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर ईश्वरपूरसह सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी, आरोपींची भूमिका आणि इतर बाबींचा तपास केला जात आहे. पीडित तरुणीचा जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.


