स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : घरफोडीच्या गुन्ह्यात तब्बल १२ वर्षांपासून फरार असलेल्या एका सराईत आरोपीला मुंबईच्या पायधुनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ख्वाजा सलीम शेख (वय ३६) असे या जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, गेल्या १२ वर्षांपासून तो पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होता.
पायधुनी पोलीस ठाण्यात २०१४ मध्ये गु.र.क्र. २००/२०१४ अन्वये कलक ४५४, ३८०, ३४२, ४११, ३४ भादवि प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची न्यायालयात सुनावणी सुरू असताना (कोर्ट केस क्रमांक ६८६/पीडब्ल्यू/२०१४) आरोपी ख्वाजा शेख हा फरार झाला होता. आरोपी हा अत्यंत दाट झोपडपट्टी परिसरात वास्तव्य करत असल्याने आणि त्याच्या नावाव्यतिरिक्त पोलिसांकडे कोणतीही अतिरिक्त माहिती उपलब्ध नसल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले होते.
दरम्यान, पायधुनी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू ठेवत तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे आरोपीचा माग काढला. पोलिसांनी अत्यंत चलाखीने सापळा रचून ट्रॉम्बे येथील पायलीपाडा परिसरातून आरोपी ख्वाजा शेख यास शिताफीने अटक केली. तब्बल १२ वर्षांनंतर पोलिसांच्या हातावर तुरी देणारा हा आरोपी अखेर खाकीच्या जाळ्यात अडकला आहे.
सदरची ही उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (का व सु) मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (द.प्रा.वि. शैलेश बलकवडे, दक्षिण परिमंडळ २ च्या पोलीस उपआयुक्त रागसुधा आर. आणि पायधुनी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त रेणुका बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली, पायधुनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक आर. पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुषार इक्के, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेंडगे, राणे आणि पोलीस हवालदार कानडे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.


