मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मतदार याद्यांमधील कथित घोळ आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंनी रविवारी मुंबईत ‘गर्जना मोर्चा’ काढत निवडणूक आयोगाविरोधात जोरदार आवाज उठवला. मेट्रो सिनेमा परिसरातून सुरू झालेला हा मोर्चा मुंबई महापालिका मुख्यालयाच्या परिसरात पोहोचला. या मोर्चाला काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षानेही सक्रिय पाठिंबा दिला.
मोर्चादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. व्यासपीठावर आल्यानंतर राज ठाकरे यांनी पहिल्याच वाक्यातून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. “अरे त्या ज्ञानेश कुमार याची काय तोंड लावली? ती अगोदर काढा… आपण चांगले आहोत. चांगल्या लोकांचे चेहरे लावलेत तोंडावर,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
आजचा मोर्चा नेमका कशासाठी आहे, हे सर्वांना माहिती असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील कथित अनियमिततेचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. २०१७-१८ पासून आपण निवडणूक प्रक्रिया आणि मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकाराबाबत बोलत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यावेळी सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.
“निवडणूक आयोग आणि मतदान याद्यांमध्ये जो घोळ आहे, त्याबाबत मी तेव्हापासून बोलत आहे. त्यावेळीच निवडणुकीवर बहिष्कार टाका, असे सांगितले होते. त्याशिवाय दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार नाही,” असे राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रातील मागील निवडणुकांच्या निकालावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. भाजपच्या मतांमध्ये एवढी मोठी वाढ होणे शक्य नसल्याचा दावा करत त्यांनी महायुतीच्या विजयावरही भाष्य केले. “राज्यात पूर्ण बहुमत मिळाल्यानंतरही लोकांमध्ये उत्साह दिसत नव्हता. विजय झाला, पण वातावरणात जल्लोष नव्हता,” असे ते म्हणाले.
मतदारसंख्येत मोठ्या प्रमाणावर झालेल्या वाढीचाही राज ठाकरे यांनी उल्लेख केला. २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात मतदारसंख्येत मोठी वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला. याबाबत प्रश्न उपस्थित करत निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
“आम्हाला कोणाविषयी राग नाही की तुम्ही सत्तेत बसला आहात. या देशातील मतदारांनी ठरवावे की कोणाला सत्तेवर बसवायचे,” असे म्हणत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. भाजपने दोन कोटी मतदारांची नावे मतदार यादीतून काढल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या या मोर्चामुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, निवडणूक आयोग आणि मतदार याद्यांबाबत केलेल्या आरोपांवरून आगामी काळात राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.


