सुधाकर नाडर, मुंबई
मुंबई : अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटने मानखुर्द परिसरात कारवाई करत तब्बल 84 लाख रुपये किमतीचा हायड्रो गांजा जप्त केला. या प्रकरणी मारिअप्पा पेरिआनंद देवेंद्र (वय 40) याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून एकूण 2 किलो 451 ग्रॅम वजनाचा हायड्रो गांजा जप्त करण्यात आला.
30 सप्टेंबर रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पथक गस्तीवर असताना मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवरील छेडानगर परिसरात संशयित व्यक्ती आढळून आली. वीर माता जिजामाता भोसले मार्गावरील पी.डब्ल्यू.डी. मैदान बस स्टॉपजवळ या व्यक्तीला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे हायड्रो गांजा आढळून आला.
या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कक्षात गुन्हा क्रमांक 91/2026, तसेच टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 537/2026 नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा 1985 मधील कलम 8(क) सह 20(ब) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले-श्रींगी, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. घाटकोपर युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत आदाटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक अभिजीत अहिरराव, सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक संदिप रहाणे, पोलीस उपनिरीक्षक पंकज पाटील यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.


