मुंबई प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक–२०२६ च्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून, विविध पक्षांकडून प्रचारयंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे प्रभाग क्रमांक ९३ येथील अधिकृत उमेदवार सचिन शांताराम कासारे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी, ५ जानेवारी २०२६ रोजी वांद्रे (पूर्व) येथे उत्साहात पार पडले.
हे प्रचार कार्यालय आर.पी.आय. (आठवले.) संपर्क कार्यालय, सिद्धार्थ कॉलनी वांद्रे (पूर्व), मुंबई येथे सुरू करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमास पक्षातील ज्येष्ठ नेते, अविनाश म्हातेकर, सिद्धार्थ कासारे, विवेक पवार, बाळू वाघमारे, अक्षय ससाने, महिला पदाधिकारी अस्मिता अहिरे, आदि पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला पदाधिकारी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुकीत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस कार्यक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी बोलताना उमेदवार सचिन कासारे यांनी प्रभागातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचा मानस व्यक्त केला. “सामान्य नागरिकांच्या समस्या थेट समजून घेऊन त्या मार्गी लावणे, हाच माझा राजकारणाचा हेतू आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या निवडणुकीत कासारे यांना ‘कपबशी’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले असून, मतदारांनी विकासाच्या बाजूने मतदान करून कपबशी चिन्हाला विजयी करण्याचे आवाहन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले. प्रचार कार्यालयाच्या माध्यमातून घरोघरी संपर्क, मतदार संवाद, प्रचार बैठका व विविध जनहित उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार असून, प्रभागातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाने प्रभाग क्रमांक ९३ मध्ये राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला असून, पुढील काही दिवसांत प्रचार अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.


