सातारा प्रतिनिधी
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पाचगणी शहरात कोकेन तस्करीचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दहा संशयितांना वाई येथील न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचगणी पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत सुमारे पाच लाख रुपये किमतीचे कोकेनसदृश अमली पदार्थ, दोन आलिशान चारचाकी वाहने आणि मोबाईल असा एकूण ४२ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून दोन महागड्या मोटारींमधून अमली पदार्थ पाचगणीमध्ये विक्रीसाठी आणले जात असल्याची गोपनीय माहिती पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. ही माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ सापळा रचण्यात आला.
घाटजाई मंदिर परिसरात लावलेल्या नाकाबंदीत (एमएच ०२ डीएन ०२५९) आणि (एमएच ०१ डीके ८८०२) या क्रमांकाच्या दोन मोटारी अडविण्यात आल्या. झडतीदरम्यान वाहनांतील दहा जणांच्या ताब्यात कोकेनसदृश अमली पदार्थ आढळून आले. यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात पाचगणी पोलीस ठाण्यात अमली पदार्थांच्या तस्करीचा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये महंमद नावेद सलीम परमार (भेंडी बाजार), सोहेल हशद खान (मुंबई), महंमद ओएस रिजवान अन्सारी (नागपाडा), वासिल हमीद खान (नागपाडा), महंमद साहिल अन्सारी (मुंबई सेंट्रल), जिशान इरफान शेख (भायखळा), सैफ अली कुरेशी (मज्जीद गल्ली), महंमद उबेद सिद्दिकी (भेंडी बाजार), अली अजगर सादिक राजकोटवाला (नागपाडा) आणि राहिद मुख्तार शेख (ग्रॅन्ट रोड) यांचा समावेश आहे. मुख्य संशयित महंमद नावेद परमार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मुंबईत यापूर्वी सात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, जिल्ह्यात सावरी येथील कारवाईनंतर लगेचच पाचगणीतही कोकेनसदृश अमली पदार्थ सापडल्याने सातारा जिल्ह्यात अमली पदार्थांचे नेटवर्क बळावत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. जप्त करण्यात आलेला अमली पदार्थ आरोपींनी स्वतःच्या सेवनासाठी आणला होता की विक्रीसाठी, तसेच या तस्करीमागे आणखी कोणते रॅकेट सक्रिय आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
या घटनेनंतर पाचगणी पोलिसांनी पर्यटन क्षेत्रातील हॉटेल, लॉज आणि रिसॉर्ट मालकांना कडक सूचना देत संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे. पर्यटन नगरीत अमली पदार्थांचा शिरकाव रोखण्यासाठी पुढील काळात अधिक कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.


