सातारा प्रतिनिधी
सातारा : मौजे रामोशीवाडी (पोस्ट जाखणगाव) परिसरात गांजाच्या झाडांची अवैध लागवड करीत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा सातारा आणि पुसेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ११ किलो १५६ ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे २ लाख ७८ हजार ९०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर व उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. पो.नि. अरुण देवकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सगुवहिणी वस्ती परिसरात छापा टाकण्यात आला.
छाप्यात सचिन बापू मदने (३५, रा. रामोशीवाडी, ता. खटाव) याने झोपडीलगत नऊ गांजाची झाडे लावल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून विक्रीसाठी साठवलेला गांजाही हस्तगत करण्यात आला.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक . अरुण देवकर, पुसेगाव पोलिस ठाण्याचे स.पो.नि. संदीप पोमण, पोउनि परितोष दातीर यांसह दोन्ही पथकातील अधिकारी व अंमलदार सहभागी होते. पोलिस अधीक्षक दोशी यांनी पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले.


