मुंबई प्रतिनिधी
वांद्रे (पूर्व) मतदारसंघाचे आमदार वरूण सतीश सरदेसाई यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील (एसआरए) सर्व्हे कामे तात्काळ स्थगित करण्याचे आदेश द्यावेत, अशी औपचारिक मागणी प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भातील त्यांचे पत्र २४ नोव्हेंबर रोजी सक्षम प्राधिकारी–३, एसआरए यांना पाठवण्यात आले.

सरदेसाई यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारतनगर पुनर्विकास प्रकल्पातील ३३/५ अंतर्गत सुरू असलेल्या सर्व्हे कामांबाबत स्थानिक रहिवाशांकडून तीव्र तक्रारी येत आहेत. गृहनिर्माण विभागाचे अवर सचिव यांनीही ८ ऑगस्ट २०२५ रोजी या प्रकरणाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला असून अंतिम निर्णय होणे अद्याप बाकी आहे. तोपर्यंत सर्व्हे प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी आमदारांनी केली आहे.
स्थानिक नागरिकांनी केलेल्या हस्तलिखित नोंदीत “बायोमेट्रिक सर्व्हे थांबवावा, सर्व्हेनी अडचणी निर्माण होत आहेत”, अशी तक्रार पुन्हा नमूद झाली आहे. रहिवाशांचे म्हणणे आहे की प्रलंबित प्रशासकीय निर्णयाच्या काळात घेतला जाणारा बायोमेट्रिक सर्व्हे गोंधळ वाढवणारा आहे.
सरदेसाई यांनी या तक्रारींना दुजोरा देत सांगितले की“राज्य शासनाचा अंतिम निर्णय येईपर्यंत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने सर्व्हे स्थगित करण्याचे आदेश द्यावेत.”
निवडणूक क्षेत्रातील पुनर्विकासाशी संबंधित अनेक प्रकल्पांना गती देताना, स्थानिकांचा विश्वास राखणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. पत्रासोबत त्यांनी नागरिकांच्या हरकतीही जोडून सक्षम प्राधिकाऱ्यांना तातडीची कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे.


